BLOGGER TEMPLATES AND TWITTER BACKGROUNDS

Thursday, June 18, 2009

पत्रिकेची गम्मत :


माझे वडिल कुण्डली वगैरे बघत असत .. त्या मधूनच मीही काही काळ त्या प्रकारात रस घेत गेलो होतो आणि मग माझ्या सवयीप्रमाणे त्या विषयात खोल गेलोही होतो. आता मी कुंडली पाहाण्याचे बरेचसे नियम वगैरे जाणतो पण त्या सगळ्यातला फोलपणाही माझ्या तेव्हाच एकीकडे लक्षात येत गेल्याने आता मनोरंजन या एक प्रकारात कुंडली भविष्य बघणे हे प्रकार जाऊन बसले आहेत. मग कधीतरी नाटकाच्या दौऱ्यावर नाटकातल्या मित्रांना गम्मत म्हणून जागरण करत भविष्य सांग, कधी एखाद्या मित्र-मैत्रिणीच्या एखाद्या कामाबद्दल ''bet'' लाव असे प्रकार माझे चालू असतात अधून-मधून, पण मी कुंडली हा प्रकार seriously अजिबातच घेत नाही ...


सहस्रचंद्रदर्शन या नाटकाच्या बाबतीत एक मजा ( ... म्हणजे जेव्हा ती झाली तेव्हा तोंडचं पाणी पळायची वेळ आली होती .. पण सर्व काही होऊन गेलं की आपण मजा वगैरे शांतपणे म्हणतो ना, तसा म्हणतोय मी ..) तर मजा झाली होती ती अशी की खूप दिवस आम्ही तालमी करत होतो पण आजीचा पत्ताच नव्हता ... शेवटी गीतांजली जोशी, जी तेव्हा शांताचं काम करत होती, तिने सुचवलेल्या 'स्वप्ना दातार'ला मी भेटलो. स्वप्ना याबद्दल excited होती पण तिलाही काही समस्या होत्याच .. असो .. तर ते सर्व गणित बसल्यावर ती काम करायला येऊ लागली .. ही इतर सर्व नट-मंडळी बरेच दिवस आप-आपल्या पात्राच्या दिशेने काम करत होती पण आजीला वेळ खूप कमी मिळाला होता .. तिला तिच्या पात्राच्या जवळ नेण्याच्या दृष्टीने काय काय करता येईल याचा मी सर्वतोपरी विचार करत बसे ...

एक दिवस मला अचानक काहीतरी डोक्यात आलं .. मी २००६ च्या आधीच्या चार-पांच वर्षांची काल-निर्णय कैलेंडर्स घेऊन बसलो .. मला आजीला असं काहीतरी द्यायचं होतं की जे तिला तिच्याबद्दल जास्त माहिती अथवा काहीतरी विशेष पुरवेल .. काय द्यावं ? काय असेल ते जे एका आजीला देता येईल ? या प्रश्ना-प्रश्नांमधून मला काहीतरी सुचलं होतं ...

सहस्र... घडण्याचा अंदाजे काळ आम्ही ठरवला होता २००३-२००५ च्या आसपास .. तर सहस्रचंद्रदर्शन होण्यासाठी आवश्यक परिस्थिती म्हणजे .. नाटकात असलेले सर्व सन्दर्भ लक्षात घेता .. मे महिन्यात ३-४ तारखेच्या आस-पास पौर्णिमा असणे आवश्यक होतं .. तर ते मला २००४ साली असल्याचं लक्षात आलं .. म्हणजे २००४ साली ४ मे ला पौर्णिमा होती हे !

मग माझा हा एक विशेष उद्योग सुरु झाला. आजीचं माहेर दापोली परिसरात आहे हे माझ्या मनाने नाटक लिहितानाच ठरवलं होतंच .. तो सन्दर्भ इथे .. या उद्योगात महत्वाचा होता .. मी आजीच्या वयाचा ४ मे २००४ ला ८१ वर्षं (तर हां वाढदिवस तिथिप्रमाणे असेल अश्या रितीने हा सन्दर्भ वापरून) जन्म-साल आणि महिना ठरवला आणि जन्म ठिकाण तर माहितच होतं .. आजीचं माहेरचं नावही नाटकाच्या एक खर्ड्यात मी मागे लिहून ठेवलं होतंच ... झालं .. ही सर्व माहिती मिळवून-जुळवून मी आजीची एक पूर्ण पत्रिका तयार करून घेतली ...

एका नामवंत ज्योतिष्याला ती पाहायला दिली आणि एक जुन्या पद्धतीचं सविस्तर जन्म-टिपण तयार करून घेऊन ते आजीच्या हातात ठेवलं ...

आता जे मी सांगणार आहे ते ज्योतिष्यावर विश्वास ठेवा असं सांगायला नक्कीच नाही .. कारण मीच तो ठेवत नाही .. पण interesting गम्मत अशी की या तयार केलेल्या टिपणाप्रमाणे .. ती जी कोणी आजी असेल .. म्हणजे दापोलीला जन्म झालाय अशी कल्पना करून मी जिची कुंडली तयार करून घेतली होती .. ती आजी .. तिच्या आयुष्यात त्या ज्योतिष्य-वेत्त्याच्या भाकितानुसार पुनर्विवाह, दुसऱ्या पतीपासून सन्मानाची वागणूक आणि अपत्य-प्राप्ती, त्यात मुलींची संख्या जास्त, अनेक चढ़-उतार, उतार वयात मुलांकडून दुर्लक्ष, एखाद्या समारम्भात मृत्यू असे योग होते ..

आमच्या हातात जेव्हा हे टिपण आलं .. तेव्हा .. मी आणि स्मिता ( तिच्या शेजारी राहणारे हे ज्योतिषी होते .. त्यामुळे ती ते टिपण घेऊन आली होती ना !) आम्ही दोघं अचंबित झालो .. मला क्षणभर कळेचना की काय आहे हे सर्व ... ?

पण जणू काही कोकणातल्या एखाद्या गांवात एखादी खरी आजी असावी आणि तिची कुंडली तिच्या नातेवाईकांनी करून घ्यावी तसं हे सर्व वाटत होतं हे मात्र खरं .... !!






0 comments: