मी निखिल मुजुमदार. "सहस्रचंद्रदर्शन....." ह्या नाटकात "भाऊ......" ही भूमिका करतो. पहिल्या दिवशी जेव्हा स्क्रिप्ट वाचलं तेव्हा मला ते फार आवडलं नाही. ह्यात काहीच घडत नाही असं मला वाटलं. खूप हळू-हळू गोष्टी घडत जातात. आपण जगतो तसं हे नाटक घडतं. त्यामुळे ते किती परिणामकारक होईल याबद्दल मला शंका होती. परंतू जेव्हा प्रोसेस सुरु झाली तेव्हा ते फार इंटरेस्टिंग होत गेलं...
आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी कोकण पाहिलं नव्हतं. मी ह्या बाबतीत फारच मागे होतो. मला साधी करवंद सुद्धा माहिती नव्हती. म्हणून आम्ही सगळे कोकणातील "आंजर्ले..." येथे जाऊन काही दिवस राहिलो. फार छान अनुभव होता तो. मी पूर्णपणे शहरात वाढलेला होतो. मला खेडेगाव हे काय असतं हे माहितीच नव्हतं. नाटकात मी जी भूमिका करतो आहे ती एका कोकणातल्या शेतकऱ्याची आहे. मी शेत, आंब्याची बाग ह्या गोष्टी कधी पहिल्याच नव्हत्या. चुलीवर स्वयंपाक करणे म्हणजे नक्की काय हे सुद्धा माहित नव्हतं. पण जेव्हा मी आंजर्ल्याला गेलो तेव्हा फार वेगळं वाटलं. समुद्र, कड्यावरचा गणपती, गावातला पीर, तीथे राहणारे लोक हे सगळं खूप छान, वेगळं आणि आमच्या नाटकाला पूरक असं होतं.
ह्या नाटकाच्या प्रोसेसचा भाग म्हणून आम्हाला सगळ्यांना काही वास, रंग, फूल, चव लक्षात ठेवायला सांगितलं. त्याप्रमाणे मी झेन्डूचं फूल, राखेचा रंग, काजळीचा वास आणि कुळथाच्या पिठल्याची चव ह्या गोष्टी लक्षात ठेवून, मनात साठवून पुण्यात परत आलो...
आम्ही हे नाटक उभं करण्यासाठी खूप कष्ट घेतले. खूप तालमी केल्या. मला मात्र शेवटपर्यंत "भाऊ...." हा जमत नव्हता. कुठेतरी काहीतरी कमी होतं. मला अजिबात confident वाटत नव्हतं. आमचा ११ डिसेंबर ला पहिला प्रयोग होता. ९ डिसेंबर ला आमची रंगीत तालीम होती. त्यादिवशी तालीम करत असताना काय झालं माहित नाही पण भांडणाचा सीन चालू असताना मला रडू आलं. तो interval च्या आधीचा सीन होता. तो सीन झाला, पडदा पडला आणि संयोगिता( दीपा , माझी नाटकातली मुलगी) मला मिठी मारून रडायला लागली. मला काहीच कळत नव्हतं. सगळे शांत होते. कोणीच कोणाशी ५ मिनिटे बोलू शकलं नाही. आणि नंतर प्रदीपदादा फक्त दुरून माझ्याकडे बघून हसला.......... त्यादिवशी मी पहिल्यांदा स्टेजवर "निखिल" म्हणून नाही तर "भाऊ...." म्हणून उभा होतो. प्रयोगाच्या २ दिवस आधी मला actor म्हणून मिळालेला हा breakthrough खूप महत्वाचा होता.
मला अजूनही तो दिवस आठवतो ज्या दिवशी आम्हाला आमचा राज्य नाट्य स्पर्धेचा निकाल कळला. त्या दिवशी निकाल लागणार आहे हे आम्हाला माहिती होतं. प्रयोगसुद्धा चांगला झाला होता. पण तरी मनात धाकधूक होती. प्रदीपदादाला निकाल दुपारीच कळला होतं पण त्याने दुपारी कोणालाही सांगितला नाही. आम्ही सगळे संध्याकाळी भेटलो. नेहेमीप्रमाणे गोलात बसलो. पहिली २ - ४ वाक्य दादा वेगळंच काहीतरी बोलला. आणि एकदम त्याने आम्हाला पहिल बक्षीस मिळालं असं सांगितलं. सगळे साधारण २ - ३ सेकंद शांत बसले. आणि मग एकदम सगळ्यांनी एकंच गोंधळ सुरु केला. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होतं. ४ वर्षांची प्रतीक्षा संपली होती. ४ वर्षं आम्ही एकत्र नाटक करण्याची ! आम्ही खूप धडपड, खूप अडचणींवर मात करून हे नाटक केलं होतं. त्या मेहेनतीचं चीज झालं होतं. आम्ही खुश होतो. खूप खुश होतो.........आहोत...........राहू...............एकमेकांबरोबर...............
नाटकाची प्रोसेस सुरु असताना आम्ही सगळे एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांशी शेअर करू लागलो. ह्या नाटकाने मला साधारण १५ खूप चांगले मित्र - मैत्रिणी दिले. आजही आम्ही एकमेकांवर तेवढंच प्रेम करतो जेवढं आम्ही नाटकाची प्रोसेस चालू असताना करत होतो. आम्ही भेटलो नाही तरी एकमेकांबरोबर कायम असतो.
ह्या नाटकामुळे आम्ही आयुष्यात माणूस म्हणून घडत गेलो. आम्हाला सगळ्यांना ह्या नाटकाचा आमच्या आयुष्यात खूप फायदा झाला. माझा अभ्यास सुधारला. चांगले मार्क्स मिळाले. हे नाटक चालू असताना मी २ companies मध्ये select झालो. मला Australia ला जायची संधी मिळाली. हे सगळं "सहस्र....." ने मला दिलं.
माझ्या आयुष्यातल्या काही खूप महत्वाच्या गोष्टींपैकी "सहस्र........" ही एक गोष्ट आहे. मी हे सगळं कधीच विसरू शकणार नाही. कधीच नाही.......
0 comments:
Post a Comment