अगबाई !!!!!!!!
मी वसुधा. म्हणजे सौ वसुधा सुधाकर दीक्षित.:-)
अंतर्बाह्य कोकणातली! दीक्षितांच्या माजघरामधली मायेची ऊब. सारवलेलं घर, वेखंडाचा सुगंध, जात्याची घरघर, कुळथाचं पिठलं! या साऱ्या संवेदनांचं लेण ल्यालेली ! परक्या घरातून आलेली. पण कोणाला हे सांगूनही पटणार नाही इतकी या दीक्षितांच्या घराशी एकरूप झालेली............ सगळ्यांशी मुळी मायेने वागावं असंच वाटतं मला......वाईट मेलं कशाला वागायचं आणि ?????
''सहस्रचंद्रदर्शन'' हे नाटक लिहिण्याच्या साधारण एक वर्ष आधी, एकदा प्रदीपदादाने मला विचारलन की, कोकणातल्या घरांवर ती काचेची दोन कौलं असतात, त्यातून कवडसा आत येतो तर, त्याला नेमका काय शब्द आहे? ते जरा आजीला विचारून सांग.
मी घरी विचारलं तर त्याला ''झरोका'' म्हणतात असं सगळ्यांनीच सांगितलं. प्रदीपदादालाही हाच शब्द माहित होता. मी विचारलं , का रे? एकदम झरोका वगैरे? तर दादा म्हणाला,एक नाटक लिहितोय. कोकणाच्या पार्श्वभूमीवर आहे. कौटुंबिक आहे. नाटकाचं नाव आहे, ''सहस्रचंद्रदर्शन'' !
वा वा! अप्रतीम! सगळ्याच गोष्टी मनाला भावणाऱ्या! मी खुश झाले. मग हळूहळू नाटक लिहून पूर्ण झालं . नाटकच वाचन झालं . वसुधाचा रोल मी करायचाय असा दादाने सांगितलं आणि मग खरी गम्मत सुरू झाली. प्रोसेस सुरू झाली. यापूर्वी कोकण पाहिलेली, अनुभवलेली आम्ही तिघं -चौघंच होतो. माझं घर महाडला आहे आणि आजोळ रत्नागिरीला ! त्यामुळे मी बऱ्यापैकी परिचित होते, कोकणची माती, माणसं, निसर्ग यांच्याशी.
पण..........तरीही वसुधा करणं सहजासहजी जमेना! म्हणजे असं समंजस, सोज्ज्वळ, शांत वगैरे!!!!!!! घरात एवढे प्रोब्लेम्स असतानाही हसतमुख राहायचं ........बापरे !मला तर सुरुवातीला हसतमुख राहायला जमायचंच नाही. तिथपासून सुरुवात!
आणि शिवाय दोन मुलींची आई असणं! त्यांच्याशी मायेने वागणं वगैरे......................................
पहिल्याच इम्प्रो मध्ये, '' सायलीला (मीनाला) कसलंतरी टेन्शन आलं आहे आणि ते ती तुला सांगेल '' असं ब्रीफ दादाने आम्हाला दिलंन. इम्प्रो सुरू झालं. सायली मला सांगू लागली. मी तिला थोपटू लागले. तिच्या डोक्यावर तेल घातलं तरी ती आपली कुरकुर करतच होती. मग मी हळूच तिच्या कानात तेल घातलं तर तिला खरंच गुदगुल्या व्हायला लागल्या कानात! मग आम्ही खूप हसलो. तेव्हा जे काही नातं तयार झालं आमच्यात, ते आजही आम्ही भेटलो की लग्गेच ''पाक'' करायला लागतो !
खूप छान प्रोसेस केली आम्ही! चित्रं काढली, पत्रं लिहिली, मोगरयाचे गजरे , चाफ्याची फुलं, रोज आणायचो. रोज तालमीच्या इथे आले की तिन्हीसांजेला लावतात तशी उदबत्ती लावायचे. मग रामरक्षा म्हणायचो.
प्रोसेस ची सुरुवात आम्ही प्रदीप दादाच्या घरी कुळथाच पिठलं आणि भात असा बेत करून केली होती.
दादाने प्रत्येकाला एक एक गाणं दिलं होतं. माझं गाणं होतं ''केळीचे सुकले बाग''!
नाटकात ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत असे नुसते उल्लेख येतात,त्या जवळ जवळ सर्व गोष्टींवर आम्ही इम्प्रोज केली आहेत. त्याचा खूप उपयोग झाला आम्हाला! आन्जर्ल्याची ट्रीप खूप महत्वाची ठरली यामध्ये.
''सहस्रचंद्रदर्शन''हे नाटक नाही तर एक जाणीव आहे आमच्या सगळ्यांचीच! आता ते वेगळं नाही होऊ शकत आमच्यापासून!
नारळाची झावळी, त्यातून दिसणारा चंद्र ... अथांग समुद्र .. आंब्याची कलमं, माडांच्या बागा, सोनचाफ्याचा सुगंध, सारवलेलं अंगण, ओटीवरचा झोपाळा, माजघरातील उब, आजीचे मऊमऊ हात, तिची मायेची पाखर, आजीची गोधडी, देवघर, उदबत्तीचा - धूपाचा वास, चुलीवरच कुळथाचं पिठलं ,भात, उकडीचे मोदक, माणसं, त्यांचे हेवेदावे, प्रेम, ओढ ... या आणि अश्या हज्जार गोष्टी !!!!!!!!!!!! यांचच बनलं आहे............................. ''सहस्र''चंद्रदर्शन !!